ब्लॉग - माझ्या कविता

Post date: Mar 28, 2014 6:04:54 PM

दिनांक - ०६/०५/२०१४

नोकरी सोडताना – २

एकूणच नोकरी सोडताना आपण त्या संस्थेसाठी, आपल्या सहकाऱ्यान साठी आणि इतर साऱ्यानसाठी इतिहास बनत आहोत असा भाव मनात कळतनकळत दाटत जातो. त्यातून सरकारी नोकरीत तर हा जास्तीच अनुभवास येतो. निवृतीच्या सहा महिने आधी सर्विस बुक बंद करणे, पेन्शन केस तयार होणे हि प्रक्रिया चालते आणि एक प्रकारे त्या माणसाचा त्या संस्थेमधला इतिहास बंद होऊ लागतो. बडोदे महानगरपालिकेत मुख्य लेखाधिकारी म्हणून मी निवृत्त होणारया हजारो कर्मचाऱ्यांच्या सर्विस बुक आणि पेन्शन केस वर अंतिम सही करून त्यांना इतिहास केले होते. त्याहीपुढे जाऊन ४० वर्षाहून जुन्या सर्विस बुक आणि पेन्शन केसेसना रेकोर्ड वरून दूर करण्याची सही करून मीच अनेक इतिहास मिटविले होते ह्या सत्याची जाणीव माझ्याच सर्विस बुकला मीच बंद करताना आणि माझाच पेन्शन केस मीच मंजूर करताना अतिशय तीक्ष्णपणे झाली. जणूकाही वैश्विक सत्याचा अचानक साक्षात्कार व्हावा तसे काहीसे झाले जेंव्हा माझ्याच निवृतीच्या कागदांवर सही करून मीच मला इतिहास केले कालांतराने इतरांनी त्याला मिटविण्यासाठी. ह्या साऱ्या अनुभूतीतून साकारली पुढली कविता निवृतीच्या दोन दिवस आधी. पुन्हा ह्याहि वेळेस माझ्या भावनांनी व्यक्त होण्यासाठी आधार घेतला गुजराथी भाषेचा. कदाचित माझी कार्यालयीन भाषा गुजराथी असल्यामुळे माझ्या निवृत्ती आधीच्या अनुभूतिनी गुजराथी भाषेचा आधार घेतला व्यक्त होण्यासाठी आणि एक प्रकारे ते सयुक्तिकच होते. हि कविता केल्याच्या बारा वर्षांनी आज त्या मूळ कवितेला संस्कारित करण्याचा आणि तिचा अनुवाद करण्याचा योग आला.

કવિતા - ઈતિહાસ થતા

સમજતો થયો ત્યારથી મનમાં ઘુમરાતો પ્રશ્ન,

ઈતિહાસ રચાય છે કઈ રીતે ?

ઈતિહાસ મટી જાય છે કઈ રીતે?

છેલ્લે જબાબ જડ્યો

જયારે મેં જોયો પોતાને

બંદ કરેલી સર્વિસ બુકમાં,

નવા ખોલેલા પેન્શન કેસમાં,

જકડાયેલો ઈતિહાસ થઈને ||

પછી તો બધુજ સ્પષ્ટ થયું મનમાં

મેજ હજારોને બનાવ્યા હતા ઈતિહાસ

તેમની સર્વિસ બુક બંદ કરીને,

તેમના પેન્શન કેસ ખોલીને,

કાલાંતરે હજારોના આ ઈતિહાસોને

મેજ મિટાવ્યા હતા કળીકાળની જેમ ||

હવે અસ્તિત્વમાં હોવા છતાં,

બની ગયો છું ઈતિહાસ કાગળોમાં

કોઈ સંસ્થા માટે, કેટલાક લોકો માટે

કાલાંતરે મટી જવા કાયમ માટે ||

(composed on 28/10/2012 11.0 to 11.15 pm)

कविता - इतिहास होताना

समजू लागले तेंव्हापासून

मनामध्ये घोटाळणारा प्रश्न

ईतिहास घडतो कसा?

ईतिहास मिटतो कसा?

अखेरीस उत्तर मिळाले

जेंव्हा मी पहिले मला

बंद केलेल्या सर्विस बुक मध्ये

नव्या उघडलेल्या पेन्शन केस मध्ये

जखडलेला इतिहास होऊन ||

सगळेच स्पष्ट झाले मग मनात

हजारोंना मीच बनविले होते ईतिहास

त्यांच्या सर्विस बुकात बंद करून

त्यांचे पेन्शन केस उघडून

कालांतराने हजारोंच्या या इतिहासाना

मीच मिटविले होते कलीकाळासारखे ||

आता अस्तित्वात असूनही

बनलो आहे इतिहास कागदोपत्री

कोण्या संस्थेसाठी, काही लोकांसाठी

कालांतराने कायमचा मिटून जाण्यासाठी ||

(translated from Gujarathi on 4th May 2014 – 6.15 to 6.45 pm)

दिनांक ३०/०४/२०१४

नोकरी सोडताना १

नोकरीतून स्वैच्छिक निवृत्ती किंवा राजीनामा देऊन निघणे म्हणजे त्या संस्थेमध्ये, तिथल्या माणसांमध्ये, प्रसंगांमध्ये चहूकडे फैलावलेली स्वतःची मुळे आवळून घेणे, दुसऱ्या झाडांच्या (ह्या साऱ्यांमध्ये) मुळामध्ये गुंतलेली आपली मुळे अलगद सोडवून घेणे आणि शेवटी गरज पडल्यास आपली मुले तोडून /कापून टाकणे आणि दुसरीकडे स्वतःला नेऊन रोपून घेणे, स्वतःला नवे जीवन देणे, नवा अर्थ देणे. ह्या सगळ्या प्रक्रियेच्या वेदना सहन करताना अनाहूतपणे एक अहंकार आपल्यात शिरतो आपल्या हाताने आपली पाळेमुळे कापून टाकू शकण्याचा. काही वेळा दुसऱ्या ठिकाणी रुजणे शक्य होते तर काही वेळा मुळे एवढी तुटतात, दुखावतात कि रुजणे शक्य होत नाही. एवढेच नव्हे तर जेंव्हा आपण नोकरी सोडतो तेंव्हा आपल्या बरोबर आपल्याशी जोडलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्याही भावना दुखावतात, एकप्रकारे आपली मुळे संस्थेपासून, त्यांच्या पासून सोडवताना आपल्यासारखीच त्यांचीही मुळे दुखावतात, तुटतात. एकमेकान बरोबर राहिलेल्या आठवणी जपणे हा एकाच उपाय उरतो पण ते सांगण्याचा हक्क एक प्रकारे आपण गमावलेला असतो. ह्या साऱ्या विचारातून जन्मली पुढली कविता “ मुळीया कापती वखते (पाळेमुळे तोडताना)” गुजराथी भाषेत निवृतीच्या एक दिवस आधी. आज मूळ गुजराथी कवितेला पुन्हा सारखी केली आणि तिचा मराठी अनुवाद केला जसा जमेल तसा – २९-३० एप्रिल, २०१४.

કવિતા - મુળિયા કાપતી વખતે

વિચારોમાં ખુબજ સહેલું લાગ્યું હતું

પોતાના ફેલાયેલા મુળિયા સંકોરીને બીજે જઈને વસવાનું, ફેલાવાનું,

બંધન લાગતો હતો મારા ફરતે રચાયેલો સુખાસીન, સુરક્ષિત માહોલ,

સ્વનીયન્તા બનીને મરહમ લગાડવું હતું મન પરના કેટલાક જુના જુના ઉઝરડાઓને,

ચઢાવ્યો કૈફ દિલો દિમાગમાં, અજ્ઞાતની સાથે બાથ ભીડવાનો,

અને અહંકાર અહંકાર પોતાના મુળિયા જાતે તોડવાની વેદનાઓ સેહવાનો |

આટઆટલી તૈયારીએ લાગ્યો હું મારા મુળિયા સંકોરવા, છુટા કરવા,

છીછરા માટી કોચીને, તો ઊંડે ગયેલા કાપીને

બીજાઓના મુળિયા સાથે ફસાયેલા મુળિયા હળવેકથી છુટા કરીને

વેદનાઓ તો દરેક ઉપાયમાં હતીજ, કણે કણે ક્ષણે ક્ષણે વધતીજ ગઈ

મુળિયા છુટા પાડનારીપાડનારી આંગળીઓ અકડાતી ગઈ વેદનાઓથી,

કે વેદનાઓ વધી જખડાતી આંગળીઓથી ?

નિરર્થક આ પ્રશ્ન, મુળિયા તૂટ્યા બધા ફરી વસી ન શકાય એવા

નિરર્થક એ કૈફ, એ અહંકાર, મુળિયા તૂટ્યા બધા ફરી વસી ન શકાય એવા ||

વેદનાઓની અનુભુતિએજ સમજાવી છે વેદના મારા કારણે તૂટેલા તમારા મુળીયાઓની

ખુબજ મોડું થયું છે હવે, કારમી કળ વેઠીને પણ રહ્યાસહ્યા મુળિયા છોડવા તોડવાજ રહ્યા

કહેવાનો હક ગુમાવ્યો છે મેં તો પણ કહું છું

મારા મુળિયા સાથે તૂટીને આવેલા તમારા મુળિયા હું જીવતા રાખીશજજ,

તમારી સાથે રહેલા મારા તૂટેલા મુળિયા તમે જીવતા રાખજો ||

कविता – पाळेमुळे तोडताना

विचार करताना खूप सोपे वाटले होते,

स्वतःची पाळेमुळे आवरून दुसरीकडे जाऊन रुजणे-फैलावणे;

बंधन वाटत होता सभोवतालचा सुखासीन-सुरक्षित माहोल

स्वनियंता बनून मलमही लावायचे होते मनावरच्या जुन्या ओरखड्यांना

मनावर-बुद्धीवर चढविला कैफ अज्ञाताशी झुंज घेण्याचा;

आणि अहंकार स्वतःच्या हातानी स्वतःची पाळेमुळे तोडण्याच्या वेदना भोगण्याचा ||

इतक्या साऱ्या तैयारीने लागलो मी माझी पाळेमुळे सोडवायला

उथळ मुळे मातीला खरवडून तर खोल गेलेली कापून

दुसऱ्यानमध्ये गुंतलेली हळुवार हातानी सोडवून

प्रत्येक विकल्पात होती वेदना, कणाकणाने-क्षणाक्षणाने वाढतच गेली

मुळे सोडवणारी बोटे आखडली वेदनेने कि वेदना वाढली आखडलेल्या बोटांनी?

निरर्थक हा प्रश्न, तुटली पाळेमुळे सारी, पुन्हा न रुजण्या इतकी |

निरर्थक तो कैफ, तो अहंकार तुटली पाळेमुळे सारी, पुन्हा न रुजण्या इतकी ||

वेदानाच्यावेदनांच्या अनुभूतीनेच कळली वेदना माझ्या बरोबर तुटलेल्या तुमच्या मुळांची

फार उशीर झालाय आता, जीवघेणी कळ सोसूनही उरली-सुरली मुळे तोडवायालाच हवी

काही सांगण्याचा हक्क गमावला आहे मी, तरीही सांगतो

माझ्या मुळासोबत तुटून आलेली तुमची मुळे मी तर जगवीनच

तुमच्या सोबत राहिलेली माझी तुटलेली मुळे तुंम्ही जगवा ||

दिनांक २९/०४/२०१४

नोकरीतला शेवटचा दिवस !!!

नोकरीतला शेवटचा दिवस काहींच्या आयुष्यात एकदा – दोनदा येणारा तर काहींच्या आयुष्यात अनेकदा येणारा. बहुधा हा दिवस हृद, भाऊक, अविस्मरणीय असतो पण सर्व नोकरदारांच्या आयष्यात एकदा तरी येत असल्यामुळे सर्व विशेषणे वापरता येतील इतक्या विविधतेने तो येतो.

माझ्या आयुष्यात नोकरी सोडण्याच्या प्रसंग तीनदा आला – सगळ्यात पहिली trainee account clerk ची नोकरी तीन महिन्यातच मी संपवली कारण काही दिवसातच त्याहून चांगली, कायमी अशी सरकारी नोकरी खात्रीने मिळणार होती आणि कदाचित मी जरी चालू ठेवली असती तर त्यांनीच मला काढून टाकले असते. खासगी कंपनीतील ह्या पहिल्या नोकरीला लागलो तेंव्हा अवघा २० वर्षाचा होतो. तिथे रुळलोच नाही त्यामुळे नोकरीच तीन महिन्याच्या प्रोबेशन पीरियड संपण्याच्या दिवशी राजिनाम्याचे पत्र खरडून निघून आले. फार कोणी मित्र झाले नव्हते, जिवही गुंतला नव्हता किंवा तो गुंतण्याइतकी पोच (maturity) हि नव्हती.

दुसरी नोकरी गुजरात सरकारच्या सेल्स टॅक्ष विभागात कारकून म्हणून सात महिने केली, पण पहिल्या आणि ह्या दुसऱ्या नोकरीत रुजू होताना हेतू मनाशी स्पष्ट – एकीकडे शिकत राहयचे आणि मनासारखे शिक्षण पूर्ण झाले कि किंवा दुसरी ह्याहून चांगली मिळाली कि हि नोकरी सोडवायची. त्यामुळे त्या नोकरीकधीही मी एक स्टोप गॅप म्हणूनच पाहत होतो. इथे थोडे फार संबंध निर्माण झाले पण लक्ष शिक्षणात आणि अधिक चांगल्या नोकरीकडे होते त्यामुळे जीव गुंतण्याचा प्रश्नच नव्हता. अचानक नशिबाने ह्या नोकरीपेक्षा खूप चांगली अधिकारपदाची नोकरी आणि ती पण स्वतःच्या क्षेत्रातली बडोदे महानगर पालिकेत मिळाली त्यामुळे त्या आनंदात आणि नव्या नोकरीत लगेच रुजू व्हायचे असल्यामुळे, सरकारी तंत्राकडून राजीनामा मंजूर करून घेण्यात नोकरीचे शेवटचे सात दिवस कसे गेले ते कळलेच नाही निरोप समारंभ तर बाजूला मला शेवटचा दिवस आठवतही नाही.

तिसरी महानगरपालिकेतील नोकरी २० वर्ष आणि ९ दिवस केली. ह्या नोकरीत घडलो, अनुभवाने, - ज्ञानाने – मानाने मोठा झालो. संस्थेशी, घटनांशी, त्यातल्या लोकांशी नुसता जोडला गेलो नव्हतो तर झाडांची मुळे एकमेकांत एकजीव व्हावीत तसे झाले होते. हि नोकरी सोडताना मात्र फारच अवघड गेले – मलाही – माझ्या सहकाऱ्यानाही. २३ जुलै २००२ ला राजीनाम्याची नोटीस आणि सुरु झाला प्रदीर्घ निरोपाचा कालखंड ज्यात अनेक भावना, अनेक मरणे मी जगलो, भावनिकदृष्ट्या समृद्ध झालो. अर्थातच अनेक कविताही झाल्या ह्या कालखंडात. सुरवात निवृत्तीच्या दोन तास आधी नोकरीच्या शेवटच्या दिवशीच्या अनुभवातून सुचलेल्या कवितेने करूया.

निवृत्तीचा शेवटचा दिवस विलक्षण होता. मी २३ जुलाईला राजीनामा दिल्यापासून जसजसा माझ्या निवृत्तीचा दिवस जवळ येत गेला तसतसा मी आणि माझे सहकाऱ्यामधील संवाद शब्दांपलीकडे जात गेला. शेवटच्या दिवशी तर मला माझे सहकारी पुन्हा पुन्हा येऊन भेटत होते, मी त्यांना भेटत होतो पण आम्हाला शब्दांमध्ये काहीच व्यक्त करता येत नव्हते कारण शब्दच निघत नव्हते. अश्रू आणि स्पर्शाने शब्दांची जागा घेतली होती, अश्रू आणि स्पर्शच संवादाची भाषा झाले होते. अश्या परिस्थितीत पुढल्या ओळी गुजराथी भाषेच्या माध्यमातून साकार झाल्या –

कविता - संवाद

મારે ઘણું બધું કેહવું હતું,

તમારૂ કેટકેટલુ સાંભળવું હતું,

થયા છે હવે આપણા સંબંધો શબ્દોથી પર,

છોડીએ આપણા સંવાદો આંસુ - સ્પર્શની ભાષા પર ||

(Originally composed on 30/10/2002 during 2.00 to 4.00 pm - revised on 27/04/2014 - 9.0 to 9.30 pm)

खूप काही सांगावयाचे होते मला,

खूप ऐकावयाचे होते तुमचेही मला,

संबधच झाले आता शब्दांपलीकडले आपले,

सोडूया अश्रूंच्या-स्पर्शाच्या भाषेवर संवाद आपले || (translated on 26/04/2014)

दिनांक २३/०४/२०१४

मामाच्या गावाला जाऊया

झुकझुक झुकझुक अगीनगाडी

धुरांच्या रेषा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया

हे जवळजवळ संपूर्ण गाणे यथार्थपणे लागू पाडणारे आमचे बालपण. दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी आली कि धुरांच्या रेषा हवेत काढणारी झुकझुक अगीनगाडी मामाच्या गावाला घेऊन जात असे. गाण्यातल्या प्रमाणे मामाचा गाव – मुंबई आमच्या बडोद्याच्या तुलनेत खरच खूप मोठा होता – वेगवेगळ्या स्थळांनी, वस्तूंनी, पदार्थांनी सजलेला !!

मामा हजारवार रेशीम घेणाऱ्यातला तालेवार नव्हता पण आम्हा भाचरांसाठी मनाने नक्कीच तालेवार होता आणि शिकरणीला पंचपक्वान्न मानण्याच्या आमच्या आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीची समज असलेली आम्ही भाचरे होतो त्यामुळे अपेक्षाभंगाची पाळी आली नाही त्याने त्याला जमेल तेवढे करून ती येऊ दिली नाही.

माझे बालपण कथा कादंबऱ्यामध्ये वर्णविल्यासारखे समृद्ध, सुंदर, स्वप्नवत करणाऱ्या अनेक गोष्टीनपैकी एक होता माझा वसंतमामा ! त्याची पहिली अप्रत्यक्ष आठवण म्हणजे १९६७ मी सहा – सात वर्षाचा होतो तेंव्हा कोकणातील कासार्डे ह्या गावी मला आयुष्याचे पहिले पुस्तक पोस्टाने मिळाले आणि ते पुस्तक देणारी व्यक्ती होती वसंतमामा ! ते पुस्तक होते स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचे. त्यांचे देहावसान १९६६ मध्ये झाल्यावर १९६७ मध्ये अगदी लहान मुलांसाठी चित्रकथेच्या स्वरुपात काढलेले ते पुस्तक होते. अर्थात त्या पुस्तकाचा संदर्भ, महत्व सारे मला समजून आले त्यानंतर दहा-पंधरा वर्षानंतर. सुट्टीमध्ये सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा खजिना त्याच्याघरी मिळावयाचा. त्याकाळी आवडलेल्या बाबुराव अर्नाळकर आणि त्या प्रकारच्या इतर लेखकांशी भेट झाली त्याच्याघरीच. संपूर्ण वर्षाचा सिनेमाचा कोटा मुंबईत पुरा व्हायचा त्याच्यामुळेच.

त्याच्या Camera ने फोटोग्राफी मला करू देणारा आणि जुना का होईना दूर हातात धरून फोटो काढण्याचा तो Box Camera मला भेट देणारा वसंत मामाच. आजही मी तो जपून ठेवलेला आहे. मी १० वीत असताना बैदाकरी-पाव हा प्रकार खायला घालणारा वसंत मामाच. संपूर्ण वर्षाचा सिनेमाचा कोटा मुंबईत पुरा व्हायचा त्याच्यामुळेच आणि आधी संघाचा स्वयंसेवक, नंतर पेशाने शिक्षक असल्यामुळे सामान्य परिस्थितीची जाण ठेऊन जबाबदारीने वागण्याचे, अभ्यासू होण्याचे वेळोवेळी माझे बौद्धिक घेणारही तोच.

“जमलेकी वेळ काढून भेटायला येईन” हे त्याला आणि अनेकांना मी सांगत राहतो आणि ती माणसे एक दिवस भेटण्याच्या पलीकडे निघून जातात. गाडीतून दिसणारी पळती झाडे आता मी पहात नाही तर सतत पाळणाऱ्या मला हि जुनी झाडे पहात असतात.

वसंतमामाला कविता करावयाला आवडत असत. माझ्या ब्लोगवर मी ‘पुन्हा कवितेकडे’ हि कविता ठेवल्यावर ती त्याला अवधुतने वाचून दाखवल्या ती सुधरावयास हवी अशी प्रतिक्रिया वसंतमामाने अवधूतद्वारा दिली होती. कवितेवरच्या त्याच्या सूचना घ्यायच्या राहून गेल्या. अश्या वसंतमामासाठी तो गेला त्या दिवसापासून घोळत असलेली आणि आज त्याच्या तेराव्याला पूर्ण झालेली हि कविता ----

कविता - मामाच्या गावाला

दूर देशीच्या आजोळाने,

हव्याहव्याश्या सुट्टीने,

धुरांच्या रेषा हवेत काढीत

झाडांना पळवित

मामाच्या मोठ्या गावाला नेणाऱ्या

झुकझुक अगीनगाडीने,

नटलेले बालपण

मोठे होण्याच्या स्वनात सरले

काळाच्या ओघात ती सुट्टी, ते आजोळ,

ती झुकझुक अगीनगाडी गेली

आता मामाही गेला ......

आज, उद्या कधीतरी

या जीवनाला लागेल मोठी सुट्टी तेंव्हा

अगीनगाडीने जाईन मी

मामा गेला त्या मामाच्या मोठ्या गावाला ||

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिनांक – १८/०४/२०१४

कविता – तुझाच एकाधिकार

देत राहतोस मनस्वीपणे अनेकानेक

क्षण संगती न लागणारे,

मैत्र जोडणारे, समृद्ध करणारे

मोहात पाडणारे, पतन करणारे |

निमुटपणे सामोरा मी क्षणांना

दिलासा मिळवण्या तुझ्या असण्याचा,

त्या क्षणांमधील तुझ्या दर्शनाने

संभ्रमच वाढतोय तुझ्या असण्याचा |

नाकारू कसा ह्या क्षणातून भेटणाऱ्या तुला

हे भेटणेच आधार तुझ्या अनंत शोधाचा,

नको वाटतो आता हा खेळ

क्षणाक्षणातून तुला शोधण्याचा |

जातच राहीन तरीही क्षणांमधून सामोरा तुला

अगणित भरल्या क्षणांनी मला रिता ठेवणे

वा एका दिव्य क्षणाने पूर्ण भरणे

हा एकाधिकार तुझाच

सर्वस्वी तुझाच ||

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिनांक १७ /०४/२०१४

कविता - अट्टाहास

सतत आकार बदलणाऱ्या चांदोबाचा

अंगरखा उसवणाऱ्या – घट्ट करणाऱ्या आईच्या गोष्टीत;

अखेरीस चांदोबाच्या आईने नाद सोडला

अंगरखा उसवण्याचा – घट्ट करण्याचा |

सतत आकार बदलणाऱ्या जीवनासाठी

त्या सोबत बदलणाऱ्या आपणा एकमेकांसाठी

अंगरखे बेतण्याचा अट्टाहास

आपण केंव्हा सोडणार? ||

------------------------------------------------------------------------------

कविता - बदललेला तो

दिनांक १२/०४/२०१४

प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे सामर्थ्य, सौंदर्य आणि सौष्ठव असते. एकाहून अधिक भाषांवर मनापासून प्रेम केले कि त्या शिकावयास वेळ लागत नाही आणि अश्या प्रेमाने शिकलेल्या भाषेतून व्यक्त व्हायचा प्रयत्न केला कि त्या भाषा आत्मसात व्हायला वेळ लागत नाही. भाषा आत्मसात होणे म्हणजे तिचा आत्मा आपल्या आत्म्याला समजू लागणे. काही रचना ह्या अमुक एक भाषेत अधिक चांगल्या जमतात - गझल उर्दूत, छंदबद्ध कविता, भावकविता आणि वैचारिक आणि मुक्त छंद कविता मराठी आणि हिंदीत, तर गझल आणि अत्यंत तरल कविता गुजराथीत.

खालील कविता अनेक वर्ष मला मराठीत जमतच नव्हती, मग एक दिवस ती गुजराथी भाषेत केली आणि मनाजोगी वाटली. मग तिचे मराठीत स्वतःच स्वैर रुपांतर केले. आधी गुजराथी या माझ्या मावस भाषेत आणि मग तीच कविता मायभाषेत लिहिण्याची अनुभूती 'फिरुनी नवी जन्मेन मी' सारखी. दोन्ही भाषेतील कविता गेले १० वर्षे कच्या स्वरुपात पडून होत्या, आज त्यांना पूर्ण (for time being) केल्या.

કવિતા - બદલાયેલો એ

પહેલા એ પગપાળા ફરનારો,

ક્યારેક બસથી મુસફીરી કરનારો હતો;

ચોકમાં કાર્સને ઘેરી વળતા ભીકારીઓને જોઇને એ વ્યથિત થતો,

ગુસ્સે થતો ભીખ ન આપનારા શ્રીમંતોપર ।।

ક્યારેક કોઈ ભિખારી એના સામે પણ હાથ ફેલાવતો ,

ખાલી ખિસ્સા ફંફોળતો નીકળી જતો એ અપરાધી ભાવે ।

મેહનતથી કે નસીબથી એ પણ ફેરવતો થયો પોતાનું વાહન ,

હવે રીક્ષા, ટાકસી કે એના વાહનમાંથી મુસફીરી વખતે ,

ભીખારીઓ એને પણ ઘેરી વળવા લાગ્યા,

ફેલાવીને ખાલી હાથ છેક વાહનની અંદર એની સામે ।।

મોટા ભાગે એ ગુસ્સેજ થતો આ બિનમેહનતું લોકોપર,

ક્યારેક ભીખ અપાતો મહેનતની શિખામણ સાથે ।

હવે તો એ ફરે છે વિમાનોમાં, શોફરવાળી લક્ઝરી કાર્સમાં,

જગોજગોપર બંદ કાચની એની કારને ઘેરી વળતા ભિખારીઓને જોઈ,

એ નથી વ્યથિત થતો કે નથી થતો ગુસ્સે કોઈનાપર ,

નથી હવે એનામાં અપરાધીપણું કે નથી આપવી એને શિખામણ મેહનતની ।।

એની દુનિયામાંથી ભીખારીઓ, એમની ગરીબી, એમનાં પ્રત્યેની ભાવનાઓ

એના મનમાંથી, જીવનમાંથી હદપાર કરવાની કળા સીખી ગયો છે એ ।

(લખ્યા તારીખ 02/12/2002 ઘરે રાત્રે 8 થી 10 કલાકે, સંસ્કરણ 12/04/2014 બપોરે 2 -3 કલાકે)

कविता - बदललेला तो

पूर्वी तो पायी चालणारा,

कधी तरी बसने फिरणारा होता

चार रस्त्यावर गाड्यांभोवती पडणारे

भिखाऱ्याचे कोंडाळे त्याला व्यथित करीत असे

रागही येत असे भिख न घालणाऱ्या श्रीमंतांचा ।

क्वचित कोण्या भिखाऱ्याने चुकून पसरलाच हाथ त्याच्यासमोर

तर तो रिकामे खिसे उगाचच चाचपडत निघून जात असे अपराधीपणे ।

मेहनतीने वा नशिबाने तो फिरू लागला स्वतःच्या वाहनाने,

रिक्षा, टक्सी वा स्वतःच्या वाहनाने फिरताना

वाहनांच्या आत अगदी त्याच्यापर्यंत हाथ पसरवणाऱ्या

भिखाऱ्याचे कोंडाळे त्यालाही पडू लागले ।

बहुतेक वेळा तो चिडायचा त्या बिनमेहनतु लोकांवर,

क्वचित भिख द्यायचा मेहनत करण्याची शिकवण देत ।

आता तो फिरतो विमानात, शोफरवाल्या महागड्या गाड्यानमधून,

जागोजागी बंद काचेच्या त्याच्या गाडीला घेरणारे भिखारी पाहून

चीडही येत नाही कोणाचीही वा व्यथितही होत नाही तो कोणासाठी

नाही उरला तो अपराधीभाव, नाही ते मेहनतीची शिकवण देणे ।

त्याच्या भावविश्वातून भिखारयाना, त्यांच्या विषयीच्या भावनांना

हद्दपार करण्याची श्रीमंती कला शिकला आहे तो आता ।

(originally translated /composed from Gujarathi to Marathi on 3-4 December, 2002.)

-----------------------------------------------------------------------------------------------------

दिनांक - ११ /०४/२०१४

प्रत्येक सृजनाची (कवितेची) स्वतःची एक जन्म कथा असते. ह्या कवितेच्या सृजनाची आठवण आणि संदर्भ फारसा सुखद नाही. हि कविता सुचली माझे दिवंगत मित्र प्रसिद्ध कवी निरंजन उजगरे ह्यांच्याघरी घरी दर्शनासाठी ठेवलेल्या त्यांच्या पार्थिवाच्या आणि त्यांच्या “चाहूल” ह्या किवितेच्या सान्निध्यात १३/१२/२००४ रोजी. ह्या कवितेच्या सृजनाचा संदर्भ आणि भावनाच अश्या काही होत्या कि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी हि कविता विस्मृतीत ढकलून दिली होती.

आताही हि कविता बाहेर आली कारण २५/०१/२०१४ रोजी माझे आणि निरंजनचे common मित्र कवी हेमंत जोगळेकर आमच्याकडे रहायला आले, अर्थात त्यांच्या कवितांचे वाचन, गप्पा झाल्या. त्या दिवशी त्यांनी त्यांचा नवा कवितासंग्रह ‘तिसरा डोळा’ भेट दिला त्यामध्ये त्यांनी निरंजन वर केलेली कविता छापली आहे. ती वाचली आणि माझ्या कवितेची आठवण झाली. एवढेच नव्हे तर हेमंत जोगळेकरांच्या त्या मुलाखतीमुळे कवितेकडे/लिखाणाकडे पुन्हा वळलो. मग गेले दोन महिने अडगळीत टाकलेल्या वह्या, कच्या कवितांचे चिठोरे शोधण्याची मोहीम झाली आणि शेवटी दोन दिवसापूर्वी सारे काही सापडले आणि शेवटी आज ती ब्लॉगवर ठेवत आहे.

ह्या कवितेला निरंजन उजगरे यांच्या ‘चाहूल’ कवितेचा संदर्भ आणि तिच्यामुळेच अर्थ असल्यामुळे ती कविताहि त्यांच्या हस्ताक्षरात येथे प्रथम दिली आहे.

कविता - नव्या संबंधांची हि कविता

गळून पडतील हे ठाऊक असूनही

तुला पार करावयाची होती

सावल्यांच्या प्रदेशातील अरण्ये

आमच्या कवितांचे काजवे हाती घेऊन |

सारे कळून सवरून काय मागितलेस हे

निरागसपणे पण एका हट्टी मुलासारखे |

तू जेंव्हा निघालास पार करीत सावल्यांच्या प्रदेशातील एक एक अरण्ये

आमच्यापाशी नव्हत्या कविता वा त्यांचे काजवे

सैरावैरा फिरत होतो आम्ही त्या अरण्यांच्या काठावर

त्या घनघोर भयावह सावल्यांमधून तुला शोधून परत आणण्यासाठी |

आता तू सावल्यांच्या अरण्यापलीकडे, आम्ही अलीकडे

ह्या नव्या संबंधाची हि कविता केवळ तुझ्यासाठी ||

(Composed on 13/12/2004 11.45 to 12.15 hours at Niranjan’s Residence beside his dead body)c

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुन्हा कवितेकडे

खूप पूर्वी

कधी अचानक

कधी लपत छपत

कधी चाहूल देत,

कधी आढेवेढे घेत

तुझे मजपाशी येणे

व्यक्त होण्यासाठी

मोकळे होण्यासाठी

स्वतःला विसरण्यासाठी-समजण्यासाठी

माझे तुजपाशी येणे

अनेकविध रंगाने, ढंगाने, रूपाने

आपले अशरीर, अमूर्त एकत्र येणे होत असे.

तुझ्या सान्निध्यात उजळायचा अंतरीचा गाभा,

अस्तित्वच बदलून जायचे अंतर्बाह्य

शब्द ल्यायचे अर्थांचे अगणित पदर

केलीडोस्कॉपिक भावछटा झळकवणारे

शब्दांच्या भाव-अर्थांची संगती लावताना

तू माझी व्हायची, माझ्यातुन मूर्त व्हायची

विश्वाच्या क्षणभंगुरतेची वाळवी

मनात केंव्हा शिरली

शब्द, सृजन, अस्तित्व सारे काही

निरर्थक केंव्हा झाले

कळलेच नाही

त्यानंतरच्या आपल्या भेटीत

क्षणभंगुरतेच्या कृष्णविवराने

शोषून घेतला तुझा दिव्य प्रकाश,

सृजनाची शक्ती, जीवनरस

भारून टाकला अंतरीचा गाभा निरर्थकतेने

मी बंद केले तुझ्याकडे येणे

जगत राहिलो आयुष्य वांझपणे

उमजले अखेरीस मला

क्षणभंगुर असले सृजन, जीवन, सारे विश्व

असते ते रसरशीत, परीपूर्ण, अक्षर

ज्या क्षणापुरते ते असते

परतलो आहे पुन्हा तुजकडे

जगण्यासाठी, सृजनासाठी

क्षणाच्या अमरत्वासाठी

भंगू दे काठीण्य माझे

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कविता - ठेव

(प्रसिद्धी ललित जून २००१)

चिऊ - काऊनच्या साक्षिन दिलेला घास

'आला मंतर, कोला मंतर; बाळाचा बाऊ छूमंतर....'

म्हणून बरे केलेले तुझे बाऊ

सार काही मागे पडलंय....

चांदोमामाशी, त्याच्यावरल्या रथाशी

नात तूच तोडलंस .......

हल्ली तू गोष्टी करीत असतोस

चंद्रावरल्या अपोलो स्वाऱ्यांच्या

बागुलबुवाच्या नावान घाबरण्यातली

मजा केव्हाच संपली.

अजूनही तू रमतो आहेस थोडाफार

परीकथांमध्ये, साहसकथामध्ये.

लवकरच तेही संपेल

तुही होशील आमच्यासारखा

यंत्रवत, झापड लावून गरगर फिरणारा

कधीतरी तुझ्याकडे येईल

तुझ हरवलेलं बाल्य नव्या रुपान

तेंव्हा चिऊ-काऊ-चांदोमामाशी राखून ईमान,

हवाली कर त्याच्या आम्ही सोपवलेली

तुझ्या मनाच्या अंधारया कोपऱ्यातली

पिढ्यानपिढ्यापासूनची ठेव.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रस्त्याच्या कडेवरले

(पंधरा - सोळा वर्षापूर्वी अर्धवट सोडलेली कविता आज २९/०३/२०१४ रोजी पूर्ण केली )

तिन्हीसांजेला कातरवेळी

शहराबाहेर जाणाऱ्या गर्द अंधाऱ्या रस्त्यावर

डोळे, मन, जाणीवा बधीर करणारा

मृत प्रखर पांढरा प्रकाश ओकणाऱ्या वाहनांची

अंगावर येणारी सतत, यंत्रवत वाहणारी रांग

अपरिहार्यपणे सोसत घरी परतणारा मी |

अचानक डोळ्याच्या डाव्या कोपऱ्यातून

जिवंत प्रकाशाची, लसलसणारी अनुभूती,

रस्त्याच्या कडेला गाडीचे आपसूक थांबणे,

माझ्या समोर थोड्या थोड्या अंतरावर

रक्तवर्ण सोनेरी जिवंत प्रकाश फाकणाऱ्या चुलींची रांग

चुलीनभोवती त्या अलौकिक रक्तिम प्रकाशाने

रसरशीत, राजसी दिसणार्यांची कोंडाळी

मध्यभागी कणकेच्या गोळ्यावर

सहज लास्य करणाऱ्या कणखर हातांच्या आदिमाया |

मृत गाडीच्या अंधाऱ्या कोठडीतून मी पहात राहतो

त्या रक्तिम दिव्य प्रकाशाने उलगडलेला

वृद्ध चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या जाळ्यातील मानवी जीजीविषेचा पट,

रापलेल्या चेहऱ्यांचा राकटपणा, कोवळ्या चेहऱ्यांची झळाळी;

चुलीवरच्या खापराचे उतरणे, साऱ्यांचे भव्य-दिव्य पणे लकाकणे

विझण्याआधी दिवा मोठा व्हावा तसे,

धगीवर पाण्याचा शिडकाव, धुराचा छोटासा लोळ,

साऱ्यांचे काळवंडून काळोखात विरून जाणे |

मी निघतो तेथून

उद्या सकाळी तुम्हा आंम्हा सर्वाना दिसतील

कोळपलेली, काळवंडलेली हि सारी चिपाड शरीरे

निर्जीवपणे-अज्ञातपणे वाहू लागताना माणसांच्या लोंढ्यात ||

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कारणाशिवाय

तू सकल ज्ञान-विज्ञानाचा, ब्रम्हांडाचा निर्माता;

घडलास मात्र युगानुयुगे मानवी बुद्धीने कारणाशिवाय |

तू मानवी बुद्धीने निर्मिलेली अ-सिद्ध, अमूर्त संकल्पना;

मूर्त होत राहतोस माणसामाणसात कारणाशिवाय |

तुला नाकारताना पाहिले तुझ्या दंभी आस्तिकांना;

तू नसण्याचे सत्य मी का आक्रोशावे कारणाशिवाय |

तुझ्या भक्तानाही भेटत नाहीस अथांग प्रयत्नांनीहि;

जाणवतोस ह्या नास्तिकाच्या कणाकणात कारणाशिवाय |

कितीही प्रयत्न करावे तुझे अस्तिव नाकारण्याचे;

ध्यान लागते, ध्यास लागतो तुझाच कारणाशिवाय |

नाकारूनही तुला, सत्व तुझे आत्मि बाणतो;

वाटते उगाचच नाकारतो मी तुला कारणाशिवाय |

(composed during 5.0 pm on 06/04/2014 to 9.0 am on 07/04/2014)